अंड्याचा फंडा

Share

I recently came across “The Egg”, a deeply meaningful short story by Andy Weir (the author of The Martian). It captures the essence of ancient Hindu philosophy in a very accessible manner. It turns out that the story has been extremely popular with his readers and the author has even linked to many translations of it created by his readers. I noticed that it did not have Hindi or Marathi translations, so decided to create them myself. Following is the Marathi translation. For the Hindi translation, look here.


अंड्याचा फंडा

मूळ लेखक: अँडी विअर, मराठी भाषांतर : विनायक भालेराव 
By Manaku - https://theprint.in/pageturner/afterword/b-n-goswamy-brings-life-elusive-pahari-painter-manaku-guler/14421/, Public Domain, https://commons.wikimedia.org/w/index.php?curid=69671721

एके दिवशी, कारने घरी जाता जाता अकस्मात तुझा मृत्यू झाला.

तसं म्हटलं तर एक सामान्य अपघातच म्हटलं पाहिजे. फारसं उल्लेखनीय काही झालं नाही, पण तुझ्यासाठी मात्र ते प्राणघातकच ठरलं. तुला तुझ्या बायको मुलांना सोडून द्यावं लागलं, हे मात्र खरं.

अपघात तसा तुझ्यासाठी वेदनारहित होता. ईएमटींनी तुला वाचवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला, पण काही उपयोग नाही झाला. तुझ्या शरीराची इतकी वाईट परिस्थिती झाली होती, की खरं म्हटलं तर तुझ्या दृष्टीनं बरं झालं असंच म्हटलं पाहिजे.

आणि तेव्हाच आपली भेट झाली.

“काय… काय झालं?” तू विचारलं, “मी कुठे आहे?”

“तुम्ही मरण पावला आहात,” मी सरळपणे सांगून टाकलं. या बाबतीत फार आढेवेढे घेण्यात काय अर्थ आहे?

“ओह, आत्ता आठवलं, समोरुन एक ट्रक येत होता, बहुतेक त्याचा ब्रेक फेल झाला असावा…”

“हो,” मी म्हणालो.

“मग मी… मी मरण पावलो?”

“हो. परंतु त्याबद्दल वाईट वाटून घेऊ नका. शेवटी प्रत्येकाला मरावं लागतं,” मी म्हणालो.

तू आजूबाजूला पाहिलं. पण कुठेही काहीही नव्हतं. इथे फक्त तू अन मी.

“ही कुठली जागा आहे?” तू विचारलं. “ह्यालाच परलोक म्हणतात कि काय?”

“थोडक्यात,” मी म्हणालो.

“आणि तू देव आहेस का?” तू विचारलं.

“होय,” मी उत्तर दिलं, “मी देव आहे.”

“माझी मुलं… माझी बायको,” तुला एकदम आठवण झाली, “त्यांचं काय? ते ठीक आहेत का?”

“अरे वा ! मला हेच पाहायचं होतं,” मी म्हणालो, “अरे तुझा नुकताच मृत्यू झाला आहे आणि तुला मुख्य चिंता लागली आहे ती तुझ्या कुटुंबाची ! हे पाहून मला फारच बरं वाटलं.”

तू माझ्याकडे निरखून पाहिलंस. तुला मी देवासारखा दिसत नव्हतो. मी एखाद्या सामान्य माणसासारखाच दिसत होतो. किंवा कदाचित एखाद्या बाईसारखा सुद्धा. असं म्हणता येईल की कोणीतरी एखादी प्रतिष्ठित व्यक्ती. सर्वशक्तिमान परमेश्वरासारखी नव्हे तर कदाचित एखाद्या प्राध्यापकासारखी.

“काळजी करू नकोस,” मी म्हणालो, “ते सगळे ठीक आहेत. हे तुझं नशीबच म्हणायला पाहिजे की अशा अवेळी मृत्यूमुळे तुझी मुलं तुला प्रत्येक परीने धडधाकट म्हणूनच लक्षात ठेवतील. तुझ्यात काही कमीपणा वगैरे जाणवायची त्यांच्यावर कधी पाळीच आली नाही.”

मी एक क्षण थांबून पुढे बोलू लागलो. हे सगळं तुझ्यासाठी फारच होत होतं. पण तुला हे सगळे सांगणं जरूर होतं.

“आणि तुझी पत्नी बाहेरून रडताना दिसेल, परंतु मनातल्या मनात तिला सुटकारा मिळाल्यासारखंच वाटेल. खरं सांगायचं तर तुमच्यात दुरावा येऊ लागला होता, हे मला माहित आहे. तुझ्यासाठी एवढंच एक समाधान म्हणता येईल की अश्या तऱ्हेने आराम वाटल्याबद्दल ती स्वतःला खूप दोषी ठरवेल.“

“हं,” तू म्हणालास. हळू हळू तुला तुझ्या खऱ्या परिस्थितीची कल्पना येऊ लागली. “मग आता पुढे काय? मी स्वर्गात जाणार की नरकात? ”

“दोन्हीकडे नाही,” मी म्हणालो, “तुझा पुनर्जन्म होणार आहे.”

“अरेच्या,” तू म्हणालास, “म्हणजे शेवटी हिंदू धर्मात सांगितलं आहे तसंच की काय?”

“सर्व धर्म आपापल्या पद्धतीने बरोबरच आहेत,” मी म्हणालो, “आपण थोडं चालूया का आता?”

आपण चालू लागलो. “आपण कुठे चाललो आहोत?” तू विचारलं.

“तसं कुठेही नाही,” मी म्हणालो, “बोलत बोलत चालायला बरं वाटतं एवढंच .”

“पण एक गोष्ट नाही कळली,” तू विचारलंस, “जेव्हा माझा पुनर्जन्म होईल, तेव्हा माझी परत नवीन पाटी, नवा खेळ, बरोबर? जणू एक नुकतच जन्मलेलं बाळ. माझे अगोदरच्या जन्मातले सगळे अनुभव आणि मी त्या जीवनात केलेल्या कोणत्याच गोष्टीचा पुढे काहीच संबंध राहणार नाही?”

“असं नाही,” मी म्हणालो, “तुझ्यात तुझ्या मागील जीवनातले सर्व ज्ञान आणि अनुभव आहेत. तुला ते आत्ता आठवत नाही आहेत इतकंच ”

मी चालणं थांबवलं आणि तुझ्याकडे रोखून म्हणालो.

“तुझा आत्मा, तू कल्पनाच करू शकत नाहीस इतका अत्यंत भव्य, दिव्य आणि अवाढव्य आहे. मानवी मनामध्ये, आपण खरं काय आहोत याचा एक छोटासा अंशच मावू शकतो. तुझ्या दृष्टीने हे पाण्यात आपलं बोट बुडवण्यासारखं आहे, हे पाहायला की पाणी गरम आहे की थंड. तुला काय वाटतं, आपण आपल्या शरीराचा एक छोटासा भाग पाण्यात बुडवला आणि आपल्याला त्या पाण्यात असलेले सर्व अनुभव मिळाले?”

“तू गेली 48 वर्षे एका मानवी शरीरात बंद होतास, त्यामुळे तुला तुझ्या विशाल अस्तित्वाचा पूर्णपणे साक्षात्कारच झालेला नाही. तुला तुझी पुरी ओळख अजून झालेली नाही. जर तू बरेच दिवस येथेच राहिलास तर हळू हळू तुला सगळे लक्षात येऊ लागेल. पण दोन आयुष्यांच्या दरम्यान तसं करण्यात काहीच अर्थ नाही.”

“मी किती वेळा पुनर्जन्म घेतला आहे?”

“अरे, खूपच वेळा. खूप खूप वेळा. ते सुद्धा बर्‍याच वेगवेगळ्या प्रकारच्या जीवांत,” मी म्हणालो, “यावेळी, तू सन 540 मधील एक चिनी शेतकरी मुलीच्या जन्माला येणार आहेस.”

“काय?” तू एकदम चमकलास, “तुम्ही मला भूतकाळात पाठवणार?”

“हो, तुझ्या दृष्टीने पाहिलं तर तसंच म्हणावं लागेल. पण काळ, जसा तुला माहित आहे, फक्त तुमच्या विश्वातच अनुभवायला मिळतो. मी जेथून आलेलो आहे, तिथल्या गोष्टी वेगळ्या आहेत.”

“आपण कुठले आहात?” तू विचारलं.

“अवघड आहे सांगणं,” मी स्पष्ट करायचा प्रयत्न केला, “मी कुठून तरी दुसरीकडून आलो आहे. फारच वेगळ्या ठिकाणाहून. आणि तिथे माझ्यासारखे इतरही आहेत. आता मला हे कळतंय की तिथे काय आहे हे जाणून घ्यायची याची तुला उत्सुकता असेल, पण खरं सांगतो, तुला समजणारच नाही.“

“अरे,” तू थोडा निराश झालास.

थोड्या वेळानं तू परत प्रश्न केलास. “पण एक गोष्ट सांगा, माझा जर का वेगवेगळ्या काळात जन्म झाला आहे तर कधी असं झालं असेल का की मी माझ्याच समोर आलो असेन?”

“असं तर नेहमीच होतं. पण दोन्ही जीवांना केवळ त्यांच्या स्वतःच्या आयुष्याविषयीच ज्ञान असल्यामुळे, त्यांच्या हे कधीच लक्षात येत नाही.”

“मग या सगळ्या प्रकाराला शेवटी काय अर्थ आहे?”

“खरंच विचारतो आहेस?” मी विचारले, “गंभीरपणे? तू मला जीवनाचा अर्थ काय असं विचारतो आहेस? इतका पचपचीत प्रश्न !”

“का? हा तर एक महत्वाचा प्रश्न आहे,” तू सोडून द्यायला तयार नव्हतास.

मी सरळ तुझ्या डोळ्यात पाहून म्हणालो, “जीवनाचा अर्थ, किंवा मी हे संपूर्ण विश्व बनवण्याचं कारण हेच की तुम्ही ज्ञानी व्हावं.”

“तुम्ही म्हणजे सगळी मानवजात, बरोबर? सगळी मानवजात ज्ञानी व्हावी अशी तुमची इच्छा आहे.”

“सगळी मानवजात नव्हे, फक्त तूच ! मी हे संपूर्ण विश्व केवळ तुझ्यासाठी बनविलं आहे. प्रत्येक नवीन जीवन जगल्यानंतर तुझ्या ज्ञानात भर पडेल आणि शेवटी तू सर्वज्ञानी होशील हा त्यातला हेतू आहे.”

“फक्त मी कसा? इतर सर्वांचं काय? ”

“महाशय, इथं दुसरं कोणीही नाही,” मी म्हणालो, “या विश्वात फक्त तू आणि मीच आहोत.”

तू फारच चक्रावून गेलास. “पण पृथ्वीवरचे सगळे लोक…”

“ते सगळे लोक तूच आहेस ! तुझेच विभिन्न अवतार !”

“काय? सगळे लोक म्हणजे मीच आहे !?

“बरोबर! शेवटी दिवा पेटायला लागलेला दिसतोय,” मी तुझ्या पाठीवर थोपटत म्हटलं.

“मी अस्तित्वात असलेला प्रत्येक माणूस आहे?”

“आत्ता अस्तित्वात असलेला, पूर्वकाळात असलेला, किंवा भविष्यात असलेला पण.”

“म्हणजे मी अब्राहम लिंकन आहे?”

“आणि जॉन विल्क्स बूथही,” मी म्हणालो.

“मी हिटलर आहे?” तू चाचरत म्हणालास.

“आणि त्याने मारलेले लाखो लोकही.”

“मी येशू आहे?”

“आणि त्याच्या मागे चालणारा प्रत्येकजणही तूच आहेस.”

तू एकदम गारच झालास.

“प्रत्येक वेळी जेव्हा तू कोणाशी वाईट वागलास, तेव्हा,” मी म्हणालो, ”तू स्वतःशीच वाईट वागत होतास. आणि जेव्हा तू कोणाशी चांगला वागलास, तेव्हा पण ते तू तुझ्याशीच चांगलं वागत होतास. आजपर्यंत कोणीही अनुभवलेला प्रत्येक आनंदी किंवा दु:खद क्षण तू स्वतःच अनुभवला होतास आणि यापुढे ही असेल. ”

तू बराच वेळ विचार केलास.

“का?” तू मला विचारलं, “हे सर्व तू का करतो आहेस?”

“कारण एके दिवशी तू ही माझ्यासारखाच होशील, म्हणून. कारण तू पण आमच्यातलाच आहेस. तू माझं मूलच आहेस. “

“ओह,” तू चमकलास, “तुम्हाला म्हणायचे आहे की मी देव आहे?”

“नाही. अजून नाही. आत्ता तू गर्भात आहेस. तुझी वाढ अजून पूर्ण व्हायची आहे. एकदा का तुझी सगळ्या प्रकारची आयुष्यं जगून झाली की मग तू खऱ्या अर्थानं जन्म घ्यायला लायक होशील.”

“तर मग हे संपूर्ण विश्व,” तू म्हणालास, “हे फक्त…”

“एक अंडं आहे.” मी उत्तर दिले.

“चला, आता तुझ्या पुनर्जन्माची वेळ आली आहे,” असं सांगून मी तुला तुझ्या मार्गाने पाठवून दिलं.

One thought on “अंड्याचा फंडा

Comments are closed.